नामवंताच्या साहित्य कृतीला प्रकाशनाच्या उजेडात आणून एक उत्तमातला उत्तम प्रकाशक म्हणून नावारूपाला येणारे अनेक प्रकाशक आहेत. मोठ मोठ्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित करून आपली प्रकाशन संस्था वाचक दरबारी भली मोठी केली…मोठं नाव करून घेतलं… परंतु, दर्जेदार साहित्य निर्मिती करणार्या खर्या तळमळीच्या प्रस्थापित ते नवोदित लेखकाचा शोध घेऊन त्याच्या कथा, कविता, कादंबर्या स्वतःचा खिसा रिकामा करून पुस्तकं काढणारा प्रकाशक म्हणजे नांदेड येथील प्रकाशन क्षेत्रातील एक निःस्वार्थ व्यक्तिमत्व इसाप प्रकाशनाचे कर्ते मा. दत्ता डांगे….प्रकाशक ते साहित्यिक म्हणून चळवळीत अनेक वर्षांपासून अग्रगन्य असलेले दत्ता डांगे आजही त्यांचं तितक्याच आपुलकीचं वागणं असल्याने नवोदित प्रस्थापितांचा गोतावळा कायम आहे.
आपल्यातला साहित्यिक जिवंत ठेऊन…अंतर्मनातल्या भावभावनांचा गुंता सोडवत…. पुस्तक प्रकाशनाची चळवळ….धुरा मा.दत्ता डांगे यांनी १९८४ पासून सुरू केली. प्रारंभी महाराष्ट्रातील नव्या कवींना व्यासपीठ मिळावे म्हणून ‘मैफिल’ हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित केला. याचे साहित्यक्षेत्रातून चांगले स्वागत झाले.
यातूनच डांगे यांना प्रेरणा-उत्साह मिळाला आणि त्यामुळेच महत्त्वाकांक्षी असे ’शब्दमेघ’ व ’भावपिसारा’ हे दोन प्रातिनिधिक कवितासंग्रह या साहित्यवेड्या व्यक्तिमत्वाने प्रकाशित केले. यापैकी ’शब्दमेघ’ला तर वक्तादशसहस्रेषु मा. श्री राम शेवाळकर यांची ‘पाठराखण’ होती !….अशा दिग्गजांचा सहवास दत्ता डांगे यांना बळ देणारा ठरला.
याच काळात नव्या साहित्यिकांना एकमेकांशी संपर्क साधता यावा … त्यांच्यात स्नेह वाढावा म्हणून ’नवे क्षितिज’ ही महाराष्ट्रातील नवसाहित्यिकांची सूची डांगे सरांनी प्रकाशित केली. यामुळे अनेक नवसाहित्यिक एकत्र येऊ शकले.या रूपाने एकमेकांची ओळख होऊ लागली. या प्रातिनिधिक उपक्रमांच्या प्रेरणेतूनच इसाप प्रकाशनाची पायाभरणी झाली. आणि सन १९९२ साली इसाप प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.
दत्ता डांगे सरांच्या स्वभावासारखेचं त्यांच्या प्रकाशनाचे नावही…समाजमनाचे दुःख आपल्या शब्दात मांडताना तळकाठ गाठत असते…..म्हणूनच त्यांच्या लिखाणाला एक वेगळी धार आहे… तोचं बाणा कायम ठेवत…त्यांच्या प्रकाशनाच्या नावातही एक इतिहास दडला आहे…ते म्हणाले… इसाप हा गुलाम होता. तो थोर- महान नीतिकथाकार होता…त्याच्या चरित्र आणि बालनीतिकथांनी माझ्या मनावर राज्य केले म्हणून माझ्या प्रकाशनाचे नावही ‘इसाप प्रकाशन’ असे ठेवले…. इसाप प्रकाशनातर्फे पहिले पुस्तक माझीच बालकादंबरी ‘शिकला गजा झाला राजा’ ही प्रकाशित केली. या पहिल्याच पुस्तकाने मला मराठवाड्याच्या बालसाहित्याच्या प्रांतात मानाचे स्थान मिळवून दिले
ग्रामीण साहित्यिक हा इसाप प्रकाशनाचा आत्मा आहे. मीही खेडेगावातून…गावशिवारातून आल्यामुळे असेल कदाचित परंतु, मला ग्रामीण साहित्यिकाविषयी जिव्हाळा आहे. त्यातल्यात्यात गरीब असेल आणि त्याच्या कथा..कविता… चांगल्या असतील तर पैशांचा कुठलाही विचार न करता मी प्रकाशनास घेतो….हा प्रांजळ स्वभाव त्यांच्या सहवासात असल्या कारणाने डांगे सरांना अनुभवता आला….हे माझं भाग्यचं…
साहित्य आणि साहित्यिकावरील प्रेम यामुळेच दत्ता डांगे सरांनी आजपर्यंत रा. रं. बोराडे, ग. पि. मनूरकर, डॉ. भगवान कौठेकर, प्रा. निवृत्ती चांडोळकर, प्रा. भारतभूषण गायकवाड, प्रा. डॉ. जगदीश कदम, विजय गं. वाकडे, प्रा. डॉ. भगवान अंजनीकर, दा. मा. बेंडे, प्रा. डॉ. आत्माराम खंडागळे, ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर, प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, प्राचार्य अशोक गवते पाटील, शंकर वाडेवाले, सुरेश सावंत, देवीदास फुलारी, व्यंकटेश चौधरी, प्रा. नारायण शिंदे, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, प्रा. डॉ. माधव बसवंते, सुधाकर गाजरे, प्रा. महेश मोरे, नागेश शेवाळकर , दिगंबर कदम, दु. मो. लोणे, सी. आर. पंडित, लक्ष्मण मलगिरवार, प्रा. सु. ग. जाधव, वि. न. भोळे, आनंद पुपलवाड, शिवा कांबळे, प्र. श्री. जाधव, विलास सिंदगीकर, सय्यद अल्लाउद्दीन, प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड, भी. च. जुजगार, भास्कर शिंदे, प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण, प्रा. माधव जाधव, वीरभद्र मिरेवाड, उद्धव सोनकांबळे, बा. बा. विश्वकर्मा, अशोक कुबडे, ज्ञानेश्वर गायकवाड या मान्यवर व नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित केली.
त्याचप्रमाणे डॉ. लीला धर्मपुरी, प्रा. मथु सावंत, डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर, प्रा. डॉ. ललिता शिंदे, सौ. लीला शिंदे, डॉ. करुणा जमदाडे, रोहिणी वाकडे, मीरा जांबकर, सौ. अर्चना डावरे, डॉ. श्रीदेवी आणेराव,वसुंधरा सुत्रावे, सौ. मीनाक्षी आचमे-चित्तरवाड, माया तळणकर, सौ. कुसुम चांडोळकर आदी लेखिकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा मान इसाप प्रकाशनास मिळाला. असं हे वैभव एक साहित्यिक ….प्रकाशक म्हणून मा.दत्ता डांगे सरांनी कमावले.
लेखकाच्या हाती पडावे यासाठी सर्वतोपरीची मेहनत डांगे सर घेतात. पुस्तक प्रकाशन व वाचन चळवळीतील डांगे सरांचे कार्य कौतुकास्पद आहे…यात तिळमात्रही शंकाचं नाही. इसाप प्रकाशनाने आपल्या २५ वर्षांच्या वाटचालीत जवळपास तीनशे लेखकांचे साहित्य प्रकाशात आणले. यातील बहुतांश पुस्तके ही त्या त्या लेखकांचे पहिेलेच पुस्तक होय. यातील नव्याण्णव टक्के लेखक हे ग्रामीण भागातून आलेले होत. आजपर्यंत ४७० पुस्तके प्रकाशित केली आहेत. ज्या आत्मीयतेने लेखक लिहितो त्याच आत्मीयतेने पुस्तक निर्दोष व सुस्वरूपात लेखकाच्या हाती पडावे यासाठी सर्वतोपरीची मेहनत डांगे सर घेतात.
आजपर्यंत इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या २०/२२ पुस्तकांना महाराष्ट्र शासनाने राज्यपुरस्कार देऊन लेखकांना गौरविले आहे. विशेषतः बालसाहित्य निर्मितीत इसाप प्रकाशनाचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. इसाप प्रकाशन केवळ पुस्तकेच प्रकाशित करून थांबलेले नाही तर आपल्या लेखकांची पुस्तके वाचकांपर्यंत पोहचावीत यासाठी नांदेडसह जिल्ह्याबाहेरही पंचवीस वर्षांपासून पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करीत असतात.. नांदेड, औरंगाबाद, जालना, परभणी, वसमत, मुदखेड, मुखेड, देगलूर, नायगाव (बा.) उमरी, किनवट, करकाळा आदी ठिकाणी संमेलनाच्या निमित्ताने व अन्यवेळी प्रदर्शने भरविली.
आजपर्यंत इसाप प्रकाशनाने शंभरच्या आसपास पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत.साहित्य अन् साहित्यिक जगला पाहिजे. ही तळमळ त्यांच्या कार्यात आहे म्हणूनच साहित्यवर्तुळात त्यांची नोद आहे.
‘सर्वांचे सुखी जीवन हेच माझे जीवन’ हे इसाप प्रकाशनाचे ब्रीदवाक्य आहे.
बालविकासासाठी ‘शालेय संस्कार’ हे मासिकही दहा वर्षे चालविले. विद्यार्थी आणि पालकांनाही हे मासिक खूप आवडले होते. आजही अनेक जण हे मासिक चालू करा म्हणून म्हणताहेत… केवळ आर्थिक कारणास्तव हे मासिक डांगे सरांनी बंद केले आहे.
‘शालेय संस्कार’ मासिकातर्फे नांदेडला शालेय संस्कार साहित्यसंमेलनही घेतले होते. या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिध्द बालसाहित्यिक राजा मंगळवेढेकर यांनी भूषविले होते.संमेलनं गाजवली….यात नवोदीतांना व्यक्त होण्याची संधी दिली. नुक्कतेच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या द्विभाषिक पुस्तकनिर्मितीत इसाप प्रकाशनाची पुस्तके सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत लागली आहेत.
नवलेखकांसाठी आजी-आईच्या भूमिकेत दत्ता डांगे आहेत…असे साहित्यजगतात बोलल्या जात आहे…त्या बद्धल एका कार्यक्रमात मी सहज त्यांना विचारलो तर ते म्हणाले… मला काही जण म्हणतात की, तुमच्या प्रकाशनाने आता चांगला नावलौकिक मिळविला आहे…मग आता नवलेखकांची पुस्तके कशाला काढता?… नामवंतांची काढायला हवीत.
यावर मी त्यांना सांगतो की, लहान-बाळ रांगत असते. त्याला नंतर उभं राहावसं वाटते. अशावेळी आई आजी त्या बाळाचे दोन्ही हात धरते. त्याला उभे करण्याचा प्रयत्न करते. बाळही आई- आजीच्या आधाराने जमिनीवर पाय टेकवण्याची धडपड करतो… पुढे आई- आजीच्या मदतीनेच बाळ चालायला शिकते. या आई- आजीसारखीच माझीही भूमिका आहे. खेड्यापाड्यातून नव्याने लिहिणार्या नवोदितांच्या हाताला धरून त्याना साहित्यविश्वात विश्वासाने चालता यावे यासाठी माझा प्रयत्न असतो. …म्हणूनच मी त्यांची पुस्तके प्रकाशित करीत असतो. मी फक्त नव्या लेखकांचा प्रकाशक आहे!
प्रसिद्धी-पुरस्कारांपासून का दूर राहतो?
आज मी प्रसिद्धीच्या क्षेत्रात काम करतो परंतु प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून मात्र मी स्वतःला दूर ठेवतो. प्रसिद्धी किंवा पुरस्कार जेव्हा माझ्याकडे यायला लागतात तेव्हा मी हात जोडून त्यांना दूरच उभं राहायला सांगतो… कारण अशावेळी रखरखत्या भर उन्हात भरदुपारी शेतात नांगर हाकणारा… अंगावर घामाच्या धारा लागलेला शेतकरी मला दिसत असतो. त्याने एक ओळ नांगरण्यासाठी घेतलेले कष्टही आम्ही वर्षभरात घेतलेले नसतात… मग प्रसिद्धी कोणाला मिळावी?…पुरस्कार कोणाला दिला जावा?…पहिला मान कोणाला मिळावा.. शेतकर्याला की, त्याच्यावर लिहिणार्यांना… हा विचार माझ्यासमोर येतो… आणि मी पुरस्कार आणि प्रसिद्धी यापासून माझी पावलं मागे घेतो!
मोठ्या लेखकांसाठी मोठे प्रकाशक असतातच…तिथे माझी गरज नाही…असे मत नवोदिताबद्दल डांगे सरांनी व्यक्त केले …अन् मी स्तब्ध झालो…कोण करतं एवढं…आज जो तो धन प्राप्तीच्या शोधात आहे….तर डांगे सर नव्यांना प्रकाशात आणून फक्त समाधानाचं धन जपतात..कोणालाही अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व प्रकाशन विश्वात निःस्वार्थपणे कार्य करत आहेत…त्यांच्या या चिरंजीव कार्यास सलाम….अन् पुढील वाटचालीस शिवारभर शुभेच्छा…..